शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही!

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी केवळ शेतकऱ्यांच्या मुद्दयावर चर्चा करण्याचा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग करत सरकारवर हल्ला चढवला. सभात्याग केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास सरकारने नकार दिला आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी अक्षरश: उघड्यावर पडेल. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आम्हाला पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाहीदेखील अजित पवारांनी दिली. अजित पवार म्हणाले, सभागृहात देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत की, निफाडतर्फे कांदा खरेदी सुरू आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी निफाडने कांदा खरेदी सुरू केलेली नाही. सरकारतर्फे सभागृहात खोटे बोलले जात आहे.

केवळ कांदाच नव्हे तर भाजीपालाही मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अवकाळीमुळे भाजीपाला मातीमोल होत आहे. अशा अडचणीत शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्याचे ओशासन दिले पाहीजे. अजित पवार म्हणाले, मविआ सरकारने अतिवृष्टी झाली तेव्हा ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत करण्याच निर्णय घेतला होता. मात्र, आताचे सरकार असे तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देत असल्याचे दिसत नाही. राज्यात उद्याही पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल होईल. त्याला तातडीने दिलासा देणे आवश्यक आहे. अजित पवार म्हणाले, पीक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश आतापर्यंत सरकारने द्यायला हवे होते. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तरी मदत जाहीर करायला हवी होती. मात्र, सरकार अजूनही शेतकऱ्यांचे हाल पाहत आहे. अशा वातावरण शेतकरी उद्ध्वस्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *