नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साठीची ब्लूप्रिंट तयार असून ज्या राज्यांमध्ये भाजपाला आपली व्याप्ती वाढवायची आहे, अशा राज्यांत या वर्षाच्या अखेरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास १०० मोठ्या सभा होणार आहेत. तसेच यामाध्यमातून महिला आणि अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहोचण्याचा पर्यत्न केला जाईल. दक्षिणेतील राज्य, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १६० मतदारसंघांकडे विशेष लक्ष देऊन त्याठिकाणी जोरदार प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे.
भाजपामधील सूंत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नवीन कार्यक्रम आणि प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सप्टेंबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडका सुरू होईल. तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपाला फारसा जनाधार नाही, त्याठिकाणी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जाईल. तसेच अशा राज्यांना चांगला निधी देण्यात येईल. भाजपाने याआधीच महिला आणि अल्पसंख्याक समुदायावर लक्ष केंद्रीत करून विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. केंद्राच्या महिलांसाठी असलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी महिला मोर्चाकडे देण्यात आली आहे. तर अल्पसंख्याक मोर्चाने १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ६० लोकसभा मतदारसंघांची यादी तयार केली आहे.