महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या रविवारी दुसरा भूकंप झाला. त्या भूकंपाचे पडसाद २-४ दिवस उमटले. काही इकडचे तिकडे गेले, काही तिकडचे इकडे आले. शेवटी निष्ठेपेक्षा सत्ता वरचढ ठरली. सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले अजित पवार आपल्या पक्षाकडे आमदारांना वळवण्यासाठी आर्थिक ओशासने देत आहेत. परवा बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिंगणे शरद पवारांकडून अजित पवार यांच्याकडे गेले. त्यांनी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेची व्यवस्था लावायची आहे.
अकोल्याचे एक आमदारही इकडे परतले. इतर अनेक आमदारांना जी जी ओशासने पवार देत आहेत ती ती ओशासने त्यांच्याकडे अर्थ खाते येणार आहे असे यावरून दिसत आहे. अजित पवारांनी हा मार्ग असाच निवडलेला नाही. अर्थ खाते किंवा या सरकारचे मुख्यमंत्रीपद यापैकी काहीही त्यांच्या हाती आले तर ते ही सर्व ओशासने पुरी करू शकतात. अजित पवार यांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जे होत असेल त्याला होय म्हणावे, जे होत नसेल त्याला नाही म्हणावे. हा त्यांचा रोखठोकपणा सर्वानाच माहीत आहे.
तिकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या शिवसेनेच्या ४० आणि त्या शिवसेनेच्या १४ आमदारांना स्पष्टीकरण मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ९० दिवसांच्या आत विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याकडे गेलेल्या अर्जांवर निकाल लावावा असे सुचविलेले आहे. म्हणजे गेल्या दोन – तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांसह १४ आमदारांच्या आमदारकीचा निकाल लावणे क्रमप्राप्त आहे. शिवसेनेच्या आमदारांत सध्या अतिशय असंतोष आहे. तो असंतोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉलची पर्वा न करता राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांचे नागपुरात स्वागत करून अर्ध्या तासातच मुंबईकडे प्रयाण केले. नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपैकी १० मंत्री असलेले आमदार वगळता चिंतेचे वातावरण आहे. २०० आमदारांचे भरभरून समर्थन आता या सरकारला प्राप्त झालेले आहे.
यापैकी भाजपचे १०५ आमदार कुठेही जाणार नाहीत हे सर्वांना ठावूक आहे. मग शिवसेनेचे ४०, अपक्षांचे १० आणि नवोदकांचे ४० अशा ९० आमदारांपैकी अनेकांना लाल गाडीची आवश्यकता वाटते. अपक्षांपैकी बाच्चू कडू कडुनिंबाच्या पानासारखे कडू कडू बोलतात. त्यांनाही सांभाळून घेणे भाग आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी कितीतरी दिवस महाराष्ट्राचा गाडा झोकाने चालविला. आता २९ मंत्री झाल्यावरही या दोन – तीन दिवसात सारे कसे शांत, शांत आहे. राष्ट्रवादीचे जे जे मंत्री आहेत, ते इतके वरिष्ठ आहेत की त्यांना महत्त्वाचे विभाग देणे अशा विशेष परिस्थितीतही भाग आहे. या प्रचंड बहुमतामुळे महाराष्ट्र सरकारला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपले राज्यकर्ते गहन विचार करत असल्यामुळे सध्या सर्वत्र शांतता आहे. पुढच्या आठवड्यात या शांततेचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी कसा सुखद उपयोग होईल याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता करीत आहे. यापुढे महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे. नंतर लोकसभा आहे आणि कदाचित लोकसभेबरोबरच विधानसभाही जोडली जाऊ शकते. तेव्हा आता हे महाराष्ट्रातील हे त्रिफळा चूर्ण जनतेसाठी आरोग्यदायी ठरो अशी आशा करून आजच्या शांततापूर्ण रविवारी शांतपणे शांतीसाठी अभिवादन करतो !