मुंबई, दि.१० सुबोध शाक्यरत्न महासागर विशेष वृत्तसेवा ११ जुलै १९९७ रोजी माता रमाई आंबेडकर नगर, घाटकोपर, मुंबई येथे प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. पुतळा विटंबनेनंतर आंबेडकरी अनुयायाच्या जमावावर राज्य राखीव पोलीस दलाचे मनोहर कदम या अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला त्यात त्याने लहान लहान मुलासह आणि महिलेसह ११ निष्पाप जिवांचा बळी घेतला. या घटनेला आता २५ वर्षे झाली आहेत. तरीही मुख्य आरोपी असलेला मनोहर कदम याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाराम खरात यांनी संताप व्यक्त केला. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यामातून सतत मोर्चे धरणे आंदोलने केली अदयापही त्यासाठीचा संघर्ष करतोय, लोकशाहीच्या माध्यामातून निवडून आलेल सरकार लोकशाहीच्या पध्दतीने आंदोलन करणाऱ्यांची दखल घेते असं कधी जाणवलंच नाही आणि आजही तसं जाणवत नाही. वास्तविकता कुठल्याही जमावावर पोलिसांनी कधी बेछूट गोळीबार केल्याचे स्मरत नाही. जमलेल्या जमावावर त्यांना पांगविण्यासाठी प्रथम लाठीमार केला जातो. अश्रुधूर सोडला जातो.
मात्र रमाई नगरात आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार का करण्यात आला ? वास्तविकता सदर जमाव शांततेच्या मार्गानेच आपला संताप आक्रोश व्यक्त करत होता. त्याच्यावर लाठीमार अश्रूधूर सोडण्याचीही गरज नसतांना अंदाबूद गोळीबार केला जणू भारत पाकिस्तानच्या सिमेवर सदर गोळीबार सुरू होता काय? रमाई नगरात गाळीबारात बळी गेलेले पाकिस्तानी होते काय ? असा सवालही खरात यांनी उपस्थित केला. आज ११ जुलै २०२३ साल उजाडले २५ वर्षे झाली. मात्र हे सतत जाणवत राहिले. शासन आणि प्रशासन दलितांना मारणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कारण जेव्हा सदर घटना घडली तेव्हा शिवसेना बीजेपीचं सरकार होतं. तेव्हा ही शासन प्रशासन मनोहर कदमला वाचविण्यासाठी सतर्क होतं. नंतर झालेल्या निवडणूकीत आंबेडकरी जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मते दिली. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आलं. मात्र सदर सरकारही मनोहर कदमच्या बाजूनेच आहे. खरं तर मनोहर कदमला सरकारने अटक करणे गरजेचे होते मात्र अँड. शकिल अहमद यांना कोर्टात केस दाखल करावी लागली. त्यासाठी ॲड. संघराज रूपवते सतत कोर्टाच्या लढाईत अग्रेसर राहिले. अँड. गजानन लासुरे, अँड. अनिकेत देशकर, ॲड. मनोज जाधव सतत या संघर्षात अग्रभागी राहिले. म्हणून किमान सदर खटला चालू तरी राहिला व कोर्टाला दखल घेऊन मनोहर कदमला अटक करण्यात आली. मात्र ती अटक फक्त कागदोपत्रीच झाली आणि विना विलंब कोर्टातच मनोहर कदमची जामिनावर मुक्तताही झाली.
एवढी चपळाई पोलिस यंत्रणेने केल्याचा आरोपही खरात यांनी केला. तरीही लोकशाही कोर्टाच्या माध्यमातून सदर लढाई सुरू ठेवली. एवढेच नव्हे तर जलदगतिने न्यायालयात खटला चालविण्यासाठी आम्ही अँड. विजय प्रधान यांची नियुक्ती करावी तसेच अँड बी.जी. बनसोडे यांची नियुक्ती करावी म्हणून त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना निवेदन दिली मात्र सतत टाळाटाळ यंत्रणेकडून होत असल्याचे लक्षात आले मात्र आम्ही सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यावेळचे गृहमंत्री मा. आर. आर. पाटीलांनी आम्ही केलेली वकिलांची मागणी मान्य केली तरी हा पोलिस यंत्रणेकडून सदर खटल्याची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ही लक्षात येत होते. तरीही कोर्टाची लढाई ॲड. संघराज रूपवतेच्या माध्यमातून सुरूच होती. आम्ही ही सतत रस्त्यावरची लढाई लढतच होतो. ही लढाई तशी विषमच प्रस्थापितांविरूध्द संघर्ष करणे किती अवघड असते याची जाणीव सतत येत होती. एका पोलिस अधिकारी मनोहर कदमला वाचविण्यासाठी पोलिस यंत्रणा किती कार्य तत्पर होती हेही दिसत होते.
आज मनोहर कदम नावाचा सैतान सनातन धर्माध दहशतवादयांना बंदूक चालविण्याचं प्रशिक्षण देतोय असं अनेक वृत्तपत्रात छापून आलयं. ज्यानं ११ माणसं मारली तो अधिक माणसे मारण्यासाठी सनातन्यांना प्रशिक्षण देतोय हे फक्त आपल्याच देशात घडू शकतं. खरं तर त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद भूषविणारे मा. ना. छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या मनोहर कदमला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेतील असं वाटत होत कारण रमाई नगरात झालेल्या गोळीबारानंतर विरोधी पक्षात असताना अत्यंत आक्रमकपणे सेना बी.जे.पी. सरकारच्या विरोधात पवित्रा घेणारे व शहीदांना न्याय देण्याची भाषा करणारे भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र त्यांनीही मनोहर कदमची पाठराखण केल्याचे जाणवते.
मा.ना. छगन भुजबळांच्या मलबार हिल येथील बंगल्यावर ॲड. संघराज रूपवते, ॲड, शकिल अहमद आणि मी स्वतः राजाराम खरात त्यांची भेट घेतली आणि मनोहर कदमला ३०२ कलम लावण्याची मागी केली असता हाताच्या मुठी एकमेकांवर आपटून आवळून अत्यंत नाटकी भाषेत त्यांनी ३०४ कलम कसे योग्य आहे असे सांगितले आणि ताबडतोब प्रतिवाद करण्याची आम्हास संधीच न देता भुजबळ आतल्या दालनात निघुन गेले. आता पुन्हा सत्तांतर झालयं त्यातील अनेक मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. मात्र त्यांच्याकडून अद्याप न्यायाची प्रतिक्षाच आहे. मनोहर कदमला शिक्षा होण्याची सुतराम शक्यता नाही. फोडाफोडीच्या राजकारणात सारेच सत्ताधीस मग्न आहेत. आज रमाई आंबेडकर नगरात नकाश्रू ढाळणारे छगन भुजबळ पुन्हा मंत्रीपदी विराजमान झाले. आजचे सत्ताधीश सतत सत्तेत असूनही रमाई आंबेडकर नगरात गोळीबार करणाऱ्या मनोहर कदमला गेल्या २५ वर्षात शिक्षा देऊ शकले नाहीत. उलट सदर सत्ताधान्यांनी सतत मनोहर कदमची पाठराखण केली असल्याची खंत रिपब्लिकन नेते राजाराम खरात यांनी व्यक्त केली.