कर्नाटक, दि.१०। प्रतिनिधी कर्नाटकातील बेळगावी येथील चिक्कोडी तालुक्यात दिगंबरा जैन साधू कामकुमार नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली. आरोपींनी जैन साधूच्या मृतदेहाचे तुकडे करून गावातील बंद बोअरवेलमध्ये टाकले. पोलिसांनी नारायण बसप्पा माडी आणि हसन दलायथ या दोघांना अटक केली आहे. सुमारे ६ लाख रुपयांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण
६ जुलै रोजी जैन मुनी कामकुमार बेपत्ता झाल्याची बातमी आली. नंदी पर्वत आश्रमातील त्यांच्या खोलीत ते सापडले नाहीत, तर त्यांची पिच्छिका आणि कमंडल तिथेच होते. ५ जुलै रोजी रात्री १० वाजेपर्यंत ते खोलीत दिसले होते. जैन साधू आपल्या आश्रमात न दिसल्याने त्यांच्या शिष्यांची चिंता वाढली. बराच शोध घेऊनही ते सापडले नाही तेव्हा आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमाप्पा उगरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी जैन साधूची हत्या केल्याची कबुली दिली. खून कोणत्या ठिकाणी झाला आणि मृतदेह कोठे फेकून दिला याबाबत दोन्ही आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होते. ८ जुलै रोजी, पोलिसांनी काटकभावी गावातील बोअरवेलमधून साडीत बांधलेल्या जैन साधूच्या शरीराचे अवयव जप्त केले. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचे तुकडे जैन समाजाच्या ताब्यात देण्यात आले. मुनिश्री यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.