उल्हासनगर , दि . १४ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार असुन मतमोजणी 16/01/2026 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, पवई चौक, उल्हासनगर–3 येथे होणार आहे .
उल्हासनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक शांततेत होणार असुन मतमोजणी प्रक्रिया सुध्दा सुलभ पणे पार पडणार आहे . सदर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र 12/01/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता शहिद अरुणकुमार वैद्य (टाऊन हॉल), उल्हासनगर–3 येथे घेण्यात आले आहे .सदरची मतमोजणीची प्रक्रिया एकूण 48 टेबलवर पार पाडण्यात येणार असून, सदर टेबलवर प्रभाग निहाय मतमोजणी ही निवडणूक निर्णय अधिकारी 1 ते 6 व त्यांचे अधिपत्याखाली नियुक्त केलेले मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक यांचे मार्फत करण्यात येणार आहे. श्री. बाळासाहेब तिडके, निवडणूक निर्णय अधिकारी — प्रभाग क्र.1,2 व 3, श्री. गणेश सांगळे, निवडणूक निर्णय अधिकारी — प्रभाग क्र.4,5 व 6 , श्री. विशाल वसंतराव जाधवर, निवडणूक निर्णय अधिकारी — प्रभाग क्र.7, 8 व 9 , श्री. विजयकुमार वाकोडे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्र.10,11 व 12, श्री. मुकेश पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी — प्रभाग क्र.13,14,15 , श्री. संजय शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्र.17,18,19 व 20 हे सहा ही निवडणुक निर्णय अधिकारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत .
दरम्यान मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णतः कायद्याच्या चौकटीत, पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय व सुरक्षा व्यवस्था सक्षमपणे करण्यात आलेली आहे. मतमोजणी प्रक्रियेबाबत अधिकृत घोषणे पूर्वी कोणतेही अंदाजीत निकाल, अफवा, अप्रमाणित माहिती, मतप्रदर्शन किंवा दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध करणे हे निवडणूक कायद्याचे स्पष्ट उल्लंघन ठरेल व या बाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा आदेशच निवडणुक आयोगाने दिला आहे . तर सर्व माध्यम प्रतिनिधींनी केवळ अधिकृत स्त्रोताकडून निर्गमित करण्यात आलेली माहितीच प्रसिद्ध करावी असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे .




