मुंबई, दि.९। प्रतिनिधी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट आधीच अस्वस्थ असताना आता शिंदे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्री असताना आपल्याला निधी दिला नाही, असा आरोप करत शिंदे गट मविआतून बाहेर पडला, त्याच अजित पवारांकडे आता अर्थखाते जाण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे सरकारमध्ये अर्थ खात्याचा कारभार देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. मात्र, शासनाच्या एका जीआरमुळे या खात्यात लवकरच बदल होण्याचे संकेत दिले जात असून हे खाते अजितदादांकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.