शिमला, दि.११। प्रतिनिधी हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पावसामुळे विविध घटनांमध्ये आतापर्यंत २० जणांना जीव गमवावा लागला आहे. दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसाने सुमारे ४ हजार कोटींच्या सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ४६४८ पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने अर्धा हिमाचल प्रदेश अंधारात बुडाला आहे. गेल्या २४ तासांत आणखी ८ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण नदी-नाल्यांच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेले. थिओग आणि सोलनमध्ये प्रत्येकी तीन आणि चंबा आणि बिलासपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मंडीमध्ये बियासच्या काठावरील ११३ घरे रिकामी करण्यात आली. काल सरासरीपेक्षा ११० टक्के जास्त पाऊस झाला. १० जुलै रोजी सरासरी ८.३ टक्के पाऊस झाला, तर काल राज्यात ९२.१ टक्के पावसाची नोंद झाली. आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट शिमला हवामान केंद्राचे संचालक डॉ. सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, आजही दिवसभर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. राज्यात १५ जुलैपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. त्यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. रस्ते, महामार्ग, पूल सर्वकाही बंद मुसळधार पावसामुळे चंदीगड-मनाली, कालका- शिमला राष्ट्रीय महामार्गासह १३२१ रस्ते विविध ठिकाणी दरड कोसळल्याने बंद आहेत. २५ हून अधिक पूल पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शिमला-धर्मशाला महामार्गावरील घंडाल येथील बेली पुलाचेही भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे.