नागपूर, दि.१२। वृत्तसंस्था मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन इंजिनच्या सरकारमध्ये बिघाडसुद्धा होऊ शकतो. तो बिघाड होऊ नये म्हणून बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू आहे. काहीही झाले तरी अजित पवार अर्थमंत्रिपदी नको, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना कडू यांनी अजितदादा अर्थमंत्री नको या भूमिकेचा पुनरूच्चार केला. राष्ट्रवादीच्या येण्याने सरकारमध्ये कुठेतरी मोठी नाराजी आहे. शिंदे गटातील आमदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे बैठकांवर बैठका सुरू आहेत. सर्व घडामोडी अचानक झाल्या. त्यामुळे चिंतेचा विषय आहेच. कुणाला कोणते खाते द्यायते, कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री करायचे, अशा अनेक भानगडी आहेत असे ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून कुठेही आनंद नाही.
सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांमध्येही नाराजी आहे. आमदारांची नाराजी होणारच आहे. अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाऊ नये, ही आमच्या गटातील आमदारांची मागणी आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचा कारभार आम्ही पाहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ते झुकते माप देणार आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष करणार. आमच्या मतदारसंघात आम्ही अजित पवार यांची ढळाढवळ बिलकुल सहन करणार नाही. ळे अर्थमंत्री पदी अजित पवार नकोच, असे बच्चू कडू म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार इतक्यात होईल असे वाटत नाही. झाला तरी विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे.