मुंबई, दि.१२। प्रतिनिधी शिंदे- फडणवीस- पवार सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री यांचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला असेल असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार हा काही तिढा नाही, याच स्तरावर हे निर्णय घेतले जाणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीकडे आपण पाहत नाही. आम्ही सर्वांनी एकमताने आणि ताकदीने पुढे जाण्याचे ठरवले आहे, असे वक्तव्य अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.
रायगडसाठी आग्रही नाही
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन आम्ही कधी आग्रही नव्हतो, एकत्रित काम करत असताना जाणीव ठेवून काम करणे गरजेचे असते,मला वाटते या संदर्भात मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. तर जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या लोकांकडे फारसे लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर अजित पवार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दिल्लीत गेले नाही म्हणून ते दिल्लीत जाणार आहेत, असे मतही तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
अजित पवार दिल्लीला रवाना
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीच्या पोर्शभूमीवर शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा विस्तार बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता होती. पण अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट काही महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसला आहे. त्यामुळे शिंदे – फडणीसांची मोठी गोची झाली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.