पाटणा, दि.१३। वृत्तसंस्था बिहार विधानसभेत सरकारविरोधात मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या मारहाणीत अनेक नेते व कार्यकर्ते जखमी झाले. जेहानाबादचे जिल्हा सरचिटणीस विजय सिंह यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाला. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधीक्षक आयएस ठाकूर यांनी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत्यूनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा विधानसभेच्या आवारात धरणे धरून बसले. भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उद्या भाजप या प्रकरणी राजभवनावर मोर्चा काढणार आहे. पोलिसांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना डाकबंगला क्रॉसिंगवर रोखण्याचा प्रयत्न केला. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने आधी वॉटर कॅननमधून पाण्याचा वर्षाव केला. अश्रुधुराचे गोळे सोडले. नंतर मारहाण केली. भाजप कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली, तसेच पोलिसांवर मिरची स्प्रेने हल्ला केला. महाराजगंजचे खासदार जनार्दन सिग्रिवाल यांनाही पोलिसांनी लाठीमार करून धक्काबुक्की केली. यामध्ये ते जखमी झाले. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. जनार्दन सिंग सिग्रिवाल यांना खॠखचड च्या खाजगी वॉर्ड-१ मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सीटी स्कॅन झाले आहे. खासदारांना वाय प्लस सुरक्षा आहे.