अयोध्या, दि.१६। वृत्तसंस्था तुम्ही पूर्वी कधी भगवान श्रीरामांची नगरी अयोध्येला गेला असाल तर आताच्या नव्या अयोध्येला ओळखू शकणार नाही. येणे-जाणे, भोजन, निवास, फिरणे हे सगळेच वेगळे असेल. सर्व महामार्गांवर (लखनऊ, गोरखपूर, गोंडाचे २, वाराणसी, बरेली) बायपासच्या जवळ भव्य प्रवेशद्वार बांधले जात आहेत. तेथे येताच अयोध्या आल्याचे जाणवेल. विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रेल्वेस्थानकाची नवीन इमारत तयार आहे. राम मंदिराजवळ चार प्रमुख मार्ग तयार होत आहेत. ५०० किमीच्या जन्मभूमी पथासाठी ३९ कोटी, ७५० मीटरच्या भक्ती पथासाठी ६२ कोटी, २ किमीच्या धर्मपथासाठी ६५ कोटी आणि १३ किमीच्या रामपथासाठी ७९७ कोटी खर्च आला आहे. हे सर्व मार्ग डिसेंबर २३ पर्यंत बांधून पूर्ण होतील. येथील दुतर्फा असलेल्या बाजारांत एकसारखा रंग व दगडांचा वापर केला जाणार आहे. पंचकोसी व १४ कोसीवर काम सुरू आहे. अयोध्येत ४७३ कोटी रुपयांत पंचकोसी व ११४० कोटी रुपयांच्या खर्चातून १४ कोसी परिक्रमा मार्गाला चौपदरी केले जाणार आहे. पंचकोसी परिक्रमा मार्ग वर्षभरात पूर्ण होऊ शकतो. १४ कोसीची मुदत निश्चित नाही. दोन्ही परिक्रमा मार्गावरील भिंतीवर रामायणातील विविध कांडाचे दर्शन होईल.