सत्तेचा खेळ, कागदी मेळ! आज सत्ताधारी पक्ष म्हणजे एनडीए आणि विरोधी पक्ष म्हणजे युपीए यांच्या बैठका दोन दिवस पार पडल्या. एनडीएची बैठक दिल्लीत झाली. यूपीएची बैठक बंगळुरूत झाली. या दोन्ही बैठकीत परस्परविरोधी वक्तव्ये होतील हे सर्वानाच ठाऊक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत जे जे नेते उपस्थित होते ते महाभ्रष्टाचारी आहेत, असा आपला नेहमीचा दावा केला. काही दिवसांपूर्वी मोदी यांनी नाव घेऊन ज्या पक्षावर भ्रष्टाचारी म्हणून टीका केली होती, त्यांना आपल्यात सामावून घेतले होते. आता त्यांच्यावर कारवाई कशी होते आणि भ्रष्टाचाराची लढाई कशी लढली जाते ते आता बघावयाचे आहे. इथे बंगळूरूत विरोधकांनी नवीन नाव धारण करून मोदी यांच्यासह सत्ताधारी पक्षांवर आगपाखड केली. नरेंद्र मोदी २ वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत, त्यांनी देश विकला, आपल्या उद्योगपती मित्रांसाठी सरकारचा उपयोग केला वगैरेसारखी टीका त्यांच्यावर करण्यात आली. आम्हाला गेल्या ५०-५५ वर्षांतील राजकारणाचे स्वरूप बघण्याचे भाग्य लाभले आहे.
ज्या काळात देशावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते, त्या नेहरू काळापासून १९७७ पर्यंत काँग्रेसचा पराभव होईपर्यंत विरोधक म्हणजे विरोधकच राहिले. ते कधी सत्ताधारी होऊ शकले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यात ते सदैव आक्रमक असत. १९७७ साली आणीबाणी संपल्यावर जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादाने जनता पक्ष सत्तेवर आला. मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. परस्परविरोधी पक्षांची मोट बांधली जाऊन जनता पक्षाचे सरकार धावू लागले. पण त्यानंतर परस्परांतील मतभेद इतके पराकोटीला पोहोचले की त्यामुळे तिसऱ्या वर्षी जनता पक्षाचे सरकार संपुष्टात आले. चरणसिंग काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांतच पायउतार व्हावे लागले. त्यानंतर एक दशक इंदिरा गांधी आणि राजीव गांधी म्हणजे काँग्रेसचे सरकार होते. त्यानंतर आघाड्यांचे राज्य सुरू झाले. त्या आघड्यांत बिघडीही होऊ लागली. ही सर्व परिस्थिती विषद करण्याचे कारण एवढेच की, विरोधी पक्षात परस्परविरोधी विचारांचे अनेक पक्ष आहेत. या सर्वांचे मोदी हटाव हे एकच लक्ष्य आहे.
यासाठी यूट्युबवरील विद्वान पत्रकार एनडीए व इंडिया कसे वरचढ आहेत याचा खुलासा करत आहेत. २०१९च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांची बेरीज करून दोन्ही पक्ष समसमान आहेत असे भासवत आहेत. भारतीय जनता पक्षालाही आपण एनडीएत असलेल्या किंवा नसलेल्या पक्षांना भाव द्यायला लागला असे यांचे २६ पक्ष आहेत, तर आपले ३८ पक्ष आहेत, असे गणित एनडीएकडून मांडण्यात आले आहे. पण या ३८ पक्षांतील एक भाजप सोडला तर इतर सर्व पक्षांची मते भाजपच्या १० कोटी नाहीत म्हणजे यूट्युब होईपर्यंत एनडीए म्हणजे भाजप म्हणजे २२ कोटी मते आणि इतर सर्व पक्ष म्हणजे २ कोटी २० लक्ष मते. इकडे काँग्रेस प्रणित इंडिया यात काँग्रेसचे २२ कोटी आणि इतर पक्षांचीही १२ कोटी मते आहेत. म्हणजे २०१९ नंतर जे पक्षीय बदल झाले आहेत यामुळे मतांच्या टक्केवारीत फरक होऊ शकतो, याचा विचार करायला कोणी तयार नाही. त्यांच्याकडून यांची बदनामी, यांच्याकडून त्यांची बदनामी असा खेळ चालू आहे.
भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर अनेक सरकारी यंत्रणांद्वारे शरसंधान केले आहे. असे यापूर्वी या देशात कधी घडले नव्हते. या दोन्ही आघाड्या आता इरेला पेटल्या आहेत. भजपला कसेही करून येणाऱ्या लोकसभेत बहुमत मिळवायचे आहे. त्याच्यावर नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे. विरोधी पक्षांजवळ आज तरी सर्वमान्य चेहरा नाही. सत्तेचा खेळ अशा कागदी मेळांवर चालत नसतो. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून जवळजवळ वर्षभराचा वेळ आहे. यामुळे भविष्यात किती बदल होतात, किती इकडून तिकडे जातात, याचा हिशेब करणेही आपले कर्तव्य राहणार आहे. भारतीय जनता सुज्ञ झालेली आहे. आता जनतेला एकच प्रश्न विचारावासा वाटतो एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मृगजळाच्या मागे धावायचे दिवस संपले आहेत. आता सत्ताधारी पक्ष म्हणतात त्यप्रमाणे भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई करतात व विरोधी पक्ष तथाकथित भ्रष्टाचारी कसा मुकाबला करतात हे भविष्यकाळात आपल्याला बघायचे आहे. एकूणच भारतीय जनतेला मनोरंजनाचे खेळ बघावयास मिळतील असे समजण्यास हरकत नाही.