बिचारा किरीट सोमय्या!

परवापासून एका वृत्ताहिनीने भ्रष्टाचार विरोधक किरीट सोमय्या यांची महाभयानक बदनामी केल्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रातील राजकारण्यांचे अनेक भ्रष्टाचारी किस्से किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणले. त्यापैकी अनेक जण आता सत्ताधारी पक्षातही आले आहेत. किरीट सोमय्या यांनी राजकारणात इमानदारी राहावी, सत्शीलता यावी आणि कोणीही जनतेच्या प्रश्नांचे शोषण करू नये म्हणून आघाडी उघडली होती. किरीट सोमय्या यांच्या या लोकहितवादी कार्यक्रमामुळे त्यांच्या विरोधात कट रचण्यात आला असावा आणि त्या कटात बिचारे सरळ-साध्या स्वभावाचे किरीट सोमय्या अडकले असावेत.

किरीट सोमय्या म्हणजे इमानदारीने भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणारा नेता, असे एकूण दृश्य होते. भ्रष्टाचार करणारे, गैरव्यवहार करणारे किती ताकदवान असतात हे आम्ही सांगण्याची गरज नाही. यामुळेच ही सर्व प्रकरणे बाहेर आली असावीत. नागपुरात एमडीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा स्थानकात असतानाचा फोटो मोबाईलवर काढताना त्याच्याच वर्गातील एका डॉक्टरला अटक करण्यात आली. मग बिचाऱ्या गरीब किरीट सोमय्या यांच्या खोलीत जे काय झाले असेल त्याचे चित्रीकरण कसे झाले याचाही शोध घेतला पाहिजे. आमचे तर असे ठाम मत आहे की, अतिशय शुद्ध चारित्र्याचे किरीट सोमय्या असे भलतेसलते काम कसे करू शकतात?

शिवसेनेच्या विरोधामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना खासदारकीचे तिकीट दिले नाही. खासदार नसले तरी किरीट सोमय्या यांनी जनतेची सेवा करण्याचा वसा सोडला नाही. आपण खासदार नसलो तरी आमच्या सर्व खास मित्रांच्या खास दाराच्या फटीतून शोधून शोधून भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढली. भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणताना जी आचारसंहिता होती त्याचे पालन करूनच किरीटबाबा आपले मंगलकार्य पार पाडत होते. त्यांच्या पोतडीत इतरही अनेकांची प्रकरणे असतील. ही प्रकरणे बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांना अडकवण्यात आले तर नाही ना? इतके चांगले कार्य करणारा नेता अशा प्रकरणात सापडला तर त्याची बोलती बंद होईल असे समजून उमजून हे कांड उघडकीस तर आले नसावे? ते काहीही असो, आमचा आमच्या किरीटभाईंवर पूर्ण विेशास आहे. ते या बालंटातून सहिसलामत मुक्त होतील अशी आम्हाला खात्री आहे.

यापुढे त्यांनी स्वतः मागणी केल्याप्रमाणे या सर्व प्रकरणाचा छडा लावून खरे काय ते पोलिसांनी शोधून काढावे असे खुद्द महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. सोमय्या यांच्या अनेक तासांच्या व्हिडिओ चित्रणाचे पुरावे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांना सादर केले आहेत. पण ते बघणारही नाही व संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द करू, असे त्यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत किरीटभाईंना लोकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, अशी आमची नम्र विनंती आहे. जनतेच्या सेवेसाठी अखंड झटणाऱ्या त्या खासदाराला क्लीन चिट मिळो, अशी आमची इच्छा आहे. बाकी सर्व पोलिसांच्या हाती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *