नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांची मदत

मुंबई, दि.२४। प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी राज्य सरकार राहणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ते आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करत होते. राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथे मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत. या ठिकाणच्या ११० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वायूदलची देखील मदत घेण्यात आली होती.

पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणीं बचाव कार्य करण्यात आले. इथ ३० लोकांना वाचवण्यात आलं आहे. पूर्णा नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणीं २० ते २५ लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यासाठी एनडीआरएफ एसडीआरएफ यांची मदत घेण्यात आली. ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तातडीने द्यावेत असे आदेश दिले आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांना १० हजार रुपये मदत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी स्वस्त धान्याच्या दुकानातून आजच धान्य पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *