मुंबई, दि.२४। प्रतिनिधी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ, सदाबहार अभिनेते आणि प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. १०० पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले. जयंत सावरकर यांचा जन्म गुहागरमध्ये ३ मे १९३६ रोजी झाला होता. ते एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते होते. वयाच्या विसाव्या वर्षीपासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली होती. मराठी, हिंदी चित्रपट आणि मलिकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाटμय संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले असल्याने मध्यमवर्गीय विचारसरणीनुसारच जीवनक्रम असावे, असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते. त्यांच्या नाटकात जाण्याला घरच्यांचा विरोध होता. त्यांनी देखील नियमितपणे नोकरी केली. पण त्याव्यतिरिक्त मिळणारा वेळ ते नाटकात घालवू लागले. १९५५ च्या सुमारास रंगभूमीविषयक काम करणारी सर्वच माणसे व्यासंगी, उच्चशिक्षित, संस्कारी घरातली होती. त्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे ते सांगत. त्या सर्वांच्या सहवासातून मी शिकत गेलो असल्याचे ते कायम सांगत होते. कारकीर्दीला सुरुवात केली तेव्हा त्यांना सातत्याने अपयश येत होते. पण ते अपयशातून सारावले. रंगभूमीवरचे कुठलेही काम त्यांनी वर्ज्य मानले नाही. ते पडद्यामागे देखील वावरले. त्यांनी अनेकदा प्रॉम्टिंग केले, प्रॉपर्टी मांडण्याचे काम केले, पोर्शसंगीत देखील वाजवले.