विरोधकांच्या इंडियाची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. या बैठकीचे आतिथ्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण महाराष्ट्रातून देण्यात आले आहे. आणि या बैठकीद्वारे आगामी डावपेचांची तसेच इंडियाच्या ११ संयोजकांची निवड येथे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडियाच्या धस्तीमुळे स्मृती इराणी यांच्यासारख्या नेत्यांनी आगपाखड सुरू केली आहे. जिथे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच इंडियावर तुटून पडत आहेत तेथे इतर नेत्यांनी तुटून पडणे स्वाभाविक आहे. हा असा पेच आहे की तो सुटता सुटत नाही. धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी स्थिती आहे. आगामी निवडणुकीच्या पोर्शभूमीवर आता पुढील ४५ दिवस ईडीचे सर्वेसर्वा मिश्राजी तुटून पडणार आहेत, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे आता इंडिया हे नावच बाद करण्याची तयारी सुरू झाली आहे. हे नाव इंग्रजांनी दिलेले आहे म्हणून त्याचा विरोध करावा असे ठरलेले दिसते.
या देशातून ७० वर्षांपूर्वी इंग्रज गेले. परंतु आपल्या देशावर लादलेली इंग्रजी भाषा अहोरात्र आपल्या मानगुटीवर बसत आहे. इंग्रजी भाषा भारतातून हद्दपार होणे आताच्या घडीला तरी मोठे कठीण वाटते. अशा इंग्रजी भाषेतील इंडियाची हकालपट्टी कशी करता येईल यावर खल सुरू असेल तरीही इंडिया बेदखल होईल असे वाटत नाही. आगामी निवडणूक जिंकायचीच आहे या जबर इच्छेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाणक्य अमित शहा आणि तमाम बडे नेते जबरदस्त ताकदीने मैदानात उतरणार आहेत. या ताकदीला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्यासाठी इंडियाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरातून सर्वच राजकीय पक्षांना अर्थपुरवठा होतो. आज यापैकी प्रचंड मोठा वाटा भाजपकडे जात आहे.
विरोधी पक्षातील मंडळी ज्या ताकदीने आणि एकजुटीने मुकाबला करण्यासाठी सत्ता पक्षात चलबिचल झालेली दिसून येत आहे. या बैठकीपूर्वी परवा आम आदमी पक्षाच्या खासदारांच्या धरण्याला काँग्रेस पक्षातर्फे खुद्द सोनिया गांधी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाठिंबा दिला ही घटना महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षाला उदारता दाखवून इंडिया अभेद्य राहील याचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही एकजूट तुटली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात व्यूहरचना आखण्यात येणार आहे. आगामी मुंबईच्या बैठकीपूर्वी आणखी कोणाकोणावर ईडीची कारवाई होते यावर मुंबईतील बैठकीचे भवितव्य अवलंबून आहे. एक मात्र नक्की काहीही झाले तरी इंडिया मागे हटेल असे वाटत नाही. ऐन निवडणुकीच्या वेळी मोदी साहेब काय चमत्कार करतात याकडे मात्र सर्वांच्या नजरा राहतील.