ठाणे, दि.३०। प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजसेवा, शिक्षण आणि वैद्यक क्षेत्र यात कार्यरत असलेल्या जीतो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदीर संकुल उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आज ठाण्यातील बाळकूम येथे आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे, महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी, व्यापार, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या हाँस्पिटलच्या नावात आनंद आहे. ज्यांनी आयुष्याभर दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद दिला. त्यांच नाव ह्या हॉस्पिटलला दिल जात आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण काय.?
दिघे साहेबांच हे जिवंत स्मारक ठरेल. आज कँसर या रोगाचे प्रमाण वाढत आहे आणि म्हणून हॉस्पिटलची गरज आहे. नागपूर मध्ये पण एक हास्पिटल होत आहे, आज इकडे होत आहे याचा आनंद आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीलाच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्यात येत आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाला लाखो सेवा कार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात ते सरसंघचालक पूज्यनीय मोहन भागवत व आध्यात्मिक गुरु श्री.दीपक भाई हे उपस्थित आहेत, हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे.
राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे नेत आहेत. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. ते म्हणाले, कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. २०३५ पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे. हा रोग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे. या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे व सेवेचे मंदीर आजूबाजूला होत आहे. या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, असा विेशास आहे. कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र भाई जैन यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.