मुंबई, दि.४। प्रतिनिधी मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटाक बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी १ तारखेपासून घाटकोपर आगरमधील २८० कंत्राटी कर्मचारी संपावर जात आजाद मैदान गाठले होते.
या संपाची या तीव्रता वाढत गेली आणि कंत्राटी तत्वावर असलेल्या मुंबईमधील विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. जवळजवळ सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मोठ्या संख्येने हे कर्मचारी आझाद मैदानात दाखल होत आहेत. आज बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरुच राहिल. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहेत.