बुलढाणा, दि.४। प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नाशिकहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा बुलढाण्यातील मेहकरजवळ अचानक समोरील टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाला ट्रक सांभाळता आला नाही. ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला जाऊन धडकला. त्यानंतर ट्रकला अचानक आग लागली आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. समृद्धी महामार्ग आणि अपघात असे जणू सुत्रच तयार होत आहे. या महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर खासगी कंपनीच्या बसचा भिषण अपघात झाला होता. अजूनही या महामार्गावर अपघांचे सत्र थांबलेले नाही. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने बाहेर उडी घेतल्याने या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातामुळे समृद्धीवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग आटोक्यात आणून रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.