पालघर, दि. २०। संजू पवार पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाडा तालुक्यातील आसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य, जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन आणि निलेश सांबरे यांचे खंदे समर्थक हबीब शेख यांना रात्री अटक करण्यात आली आहे. हबीब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेनं हबीब शेख यांना अटक केली आहे. हबीब शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोखाडा विभागातील मोखाडा खोडाळा विहीगाव राज्यमार्ग ७८ च्या रस्त्यांसाठी खासदार यांनी मागणी केल्यानुसार, शासनाकडून १० कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली होती.या कामाच्या मंजुरी करता सार्वजनीक बांधकाम विभागाकडे खासदारांनी विचारणा केली. त्यानंतर मंजुर झालेल्या कामाचा पाठपुरावा आणि त्याकरता लागणारी कागदपत्रे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांनी सादर केल्याची धक्कादायक माहिती खासदारांना मिळाली.