नवी दिल्ली, दि.२०। वृत्तसंस्था हिमाचल प्रदेशमध्ये, सिमलाच्या समरहिल भागात सात दिवसांपासून मृतदेह दबलेले आहेत. आजही तेथे बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. येथील शिव बावडी मंदिरात १४ ऑगस्ट रोजी दरड कोसळली होती, त्यात २० लोक गाडले गेले होते. तिघे अजूनही बेपत्ता आहेत. दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील तय्या पुल गोविंदघाटाजवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटकसह देशातील २० राज्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.