देशातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेत २१ राज्यांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. संघटित पद्धतीने सुरू असलेल्या या फसवणुकीत विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे बनावट संस्थांच्या माध्यमातून बनावट खात्यांवर वर्ग केले जात होते. सध्या १४४ कोटींची रक्कम उघड झाली आहे. यामध्ये संस्थाप्रमुखांपासून ते नोडल अधिकारी आणि जिल्हास्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांपर्यंतचे संगनमत समोर आले आहे. बनावट संस्था योग्य असल्याचे सांगून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे पैसे बोगस विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत राहिले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ राज्यांतील १०० जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या १५३२ संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ५३% म्हणजेच ८३० संस्था बनावट किंवा कार्यरत नसलेल्या होत्या. मात्र अधिकारी व संस्थेचे प्रमुख त्यांना ॲक्टिव्ह म्हणत राहिले. गेल्या ५ वर्षात या संस्थांमार्फत ८.१२ कोटींची शिष्यवृत्ती देण्यात आली, त्यापैकी सुमारे ४.३० कोटी बनावट संस्थांच्या बनावट खातेदारांना हस्तांतरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नावे बँक खाती असायची. त्यांची नावेही दरवर्षी बदलली जायची.
याच मोबाईल क्रमांकावरून २२३९ शिष्यवृत्ती दिली जात आहे : एकाच व्हीव्हीआयपी मोबाइल नंबरवरून २२३९आणि दुसऱ्या मोबाइल नंबर आधारे ४०५ मुलांना शिष्यवृत्ती दिली जात होती. १०वी आणि १२वीच्या परीक्षेत २ लाखांहून अधिक मुलांचे रोल नंबर सारखेच होते. १.३२ लाख विद्यार्थ्यांना वसतिगृहाची रक्कम दिली जात होती. चौकशी केली असता घटनास्थळी एकही वसतिगृह नव्हते. आसाममध्ये नागावच्या बँकेच्या शाखेतून ६६ हजार शिष्यवृत्ती डीबीटीच्या माध्यमातून जात होत्या. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात ९५% शिष्यवृत्ती सायबर सेंटरचे मालक घेत होते. देशभरात संशयाच्या भोवऱ्यात होत्या, त्याील निम्म्याहून अधिक संस्था बनावट निघाल्या. त्यांचे अस्तित्वाचे प्रमाणपत्र बनावट देण्यात आले. त्याची डीबीटी खातीही बनावट असल्याचे आढळून आले. त्याचा राज्यनिहाय तपशीलही समोर आला आहे. छत्तीसगडमध्ये संशयित असलेल्या सर्व ६२ संस्था बनावट असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील १२८ पैकी ९९ संस्था म्हणजे ७७.३% बनावट असल्याचे आढळले. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता केंद्रमधील सूत्रांकडून व्यक्त होत आहे.