अहमदनगर, दि.२१। प्रतिनिधी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्काची आकारणी केली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजातील कांदा मार्केट येथे सोमवारी नेवासे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा निर्यात शुल्काच्या केंद्र सरकारच्या आदेशाची होळी केली. जानेवारी ते मे २०२३ या कालावधीत बहुतेक ठिकाणी कांदा उत्पादकांच्या शेतावर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये जतन करून ठेवलेला निम्म्याहून अधिक कांदा सडला. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च सुद्धा निघलेले नाही. त्यात भर म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले.