मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आमच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी तीन महिन्यात पात्र-अपात्रेची कार्यवाही झाल्यानंतर गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घर कशी उपलब्ध होतील, यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, तर सुमारे पाच हजार घरांची लॉटरी काढली जाईल, ज्यातून गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा बंगल्यावर गिरणी कामगारांच्या घराविषयी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जास्त घरांचा स्टॉक उपलब्ध करणार
शिंदे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, अशी मागणी आहे. त्याच दृष्टीने आमचे सरकार स्थापन झाल्यापासून म्हाडाच्या माध्यमातून अनेक घरांच्या लॉटऱ्या काढण्यात आल्या. तर आज गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरांचा स्टॉक कसा उपलब्ध होईल, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडा सह अन्य विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून ते विविध माध्यमातून घरांसाठी जागा उपलब्ध करण्याची प्रक्रियेला गती मिळेल.