महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या फुटीसाठी ईडीला जबाबदार धरले आहे. भारतीय जनता पक्षासाठी ही ईडी सत्तेची शिडी ठरली आहे. अनेक राज्यांत सरकारी तपास यंत्रणांचा आधार घेऊन किंवा इतर मार्गाने, आमदारांचे मनपरिवर्तन झाल्यामुळे भाजपच्या हातात सत्ता आली आहे. आपले महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. शरदरावांचा हा अनुभव नवा नाही. त्यांचा पक्ष अनेकदा फुटला. पण शरद पवार यांनी अगदी ताठ मानेने तो पुन्हा उभा केला. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी घरातील व्यक्ती आणि विेशासाचे नेते पक्ष सोडून सतेच्या दालनात जाऊन बसले आहेत. शरद पवार यांनी आताच आपले सहस्रचंद्रदर्शन पार पाडले आहे. तरी ते जे करू शकतात ते इतर कुणाला शक्य नाही. हे अनेकदा सिध्द झाले असल्यामुळे फुटीर गटातील नेतेही, शरद पवार नामक विठ्ठलाच्या आशीर्वादाशिवाय भविष्यकाळात आपल्याला ‘तरणोपाय’ नाही हे जाणून आहेत. छगन भुजबळसारखे नेते तुरुंगाची वारी खाऊन आलेले आहेत.
यामुळे सत्तेला सुरुंग लावण्याच्या कार्यक्रमासाठी पुन्हा तुरुंगात जाणे छगनरावांना परवडणारे नाही. यामुळेच शरद पवारांचे खंदे सहकारी आपल्या विठ्ठलाला ‘जय महाराष्ट्र’ करून पलीकडच्या दाराने सत्तारूढ झाले आहेत. यामुळे शरद पवार यांनी ईडीच्या बाबतीत व्यक्त केलेले मत अगदी १०० टक्के खरे आहे. आता पुन्हा आपल्या फोटोचा उपयोग केला तर कायदेशीर कारवाई करू, अशी तंबी देऊन पवार साहेबांनी इंडियातील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. खुद्द शरद पवार यांच्याविरुद्धही २०१९ साली ईडीने डाव टाकला होता. पण त्यावेळेला शरद पवार यांचा रुद्रावतार बघून ईडीला फारसे काही करता आले नाही. आता लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. विरोधकांतील एकी पुढील काळात केंद्रात सत्तारूढ असलेल्या सरकारला किती आणि कसा शह देते यावर पुढील गणित अवलंबून आहे. आजच्या घडीला राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने विरोधी पक्षांकडे बरेच काही आपोआप येऊन गेले आहे. कितीही लोक गेले तरी पवार साहेबांकडे आजही येणाऱ्यांची रांग लागलेली आहे. यामुळेच आता पवार साहेबांना नव्या उमेदीने नवी टीम तयार करावी लागेल, आणि पवार साहेब ती करतील यात शंका नाही.