अयोध्या, दि.२२। वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील ओंकारेेशरमधून ६०० किलो वजनाचे शिवलिंग अयोध्येत आणले जात आहे. ५ दिवसांत १००० किलोमीटरचा प्रवास करून २३ ऑगस्टला शिवलिंग अयोध्येत पोहोचेल. शिवलिंग ४ फूट उंच आहे. ते नर्मदा नदीच्या काठी सापडले, म्हणून नर्मदेेशर महादेव म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत ओंकारेेशरजवळील बिलोरा खुर्द येथील नजर निहाल आश्रमात ते ठेवण्यात आले होते. श्री राम मंदिर परिसरातच त्याची स्थापना होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राम मंदिर ट्रस्टकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले, शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी शिवलिंगाचे पूजन केल्यानंतर ती प्रतिष्ठा यात्रा निघाली. ५ दिवसात एक हजार किमीहून अधिक प्रवास करून यात्रा अयोध्येला पोहोचणार असून २३ ऑगस्टला हे शिवलिंग रामजन्मभूमी न्यासच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अनिल मिश्रा म्हणाले, राम मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवलिंगाची स्थापना कुठे होणार? त्याचा निर्णय ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय घेतील. ते २२ ऑगस्टला अयोध्येत पोहोचणार आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजता श्रीश्री १००८ अवधूत नर्मदानंद बापजी यांनी वेदमंत्रांचा उच्चार करून शिवलिंगाला दूध, दही आणि पाण्याने अभिषेक करून अयोध्येकडे रवाना केले. मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनीही शिवलिंगाच्या पूजेत सहभाग घेतला.