मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका!

मुंबई, दि.४। वृत्तसंस्था राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. ०१ सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या १० सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी १ सप्टेंबरला पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्याचवेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून घटनेच्या ३ दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जालन्यामध्ये आंदोलनात झालेल्या दुर्दैवी प्रकाराबाबत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोललो होतो. तुमच्या आंदोलनावर आणि मागणीवर सरकार सकारात्मक पद्धतीने काम करत आहेत.

मराठा समाजाची याआधी ५८ आंदोलने झाली. ती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाली. मराठा समाज हा शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय आहे. पण या आंदोलनाच्या मागून काही लोक तेढ निर्माम करण्याचे काम करत आहे. त्यापासून मराठा आंदोलकांना सावध राहावे. इतर जे कोणी गेले ते फक्त सांगत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे म्हणत त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला तसेच, जो प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. शासन अत्यंत संवेदनशील आहे. तुम्ही आमचे काम पाहत आहात, आतापर्यंत आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. सरकार मराठा आरक्षणाबाबत संवेदनशील आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका घेऊन समिती स्थापन केली आणि सुप्रीम कोर्टात हा विषय घेऊन गेलो.

सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचे सरकार हे आरक्षण टिकवू शकले नाही. त्यामुळे आज ज्या प्रकारे विरोधातील नेते जाऊन भाषण करत आहेत, ते चुकीचे आहे. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली ती अत्यंत प्रामाणिक भूमिका आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत ज्या त्रुटी आणल्या आहेत, त्याबाबत आम्ही भोसले समितीच्या मार्फत काम करत आहोत. मराठा समाजाची आम्हाला फसवणूक करायची नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर अत्यंत बारकाईने काम करत आहोत. मराठा समाज हा मागास आहे, हे सुप्रीम कोर्टात आपल्याला सिद्ध करावे लागेल, याबाबत अत्यंत बारकाईने काम करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *