महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या ४-५ दिवसांपासून जे वातावरण ढवळून निघाले आहे त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. परस्परांना दूषणे देऊन वातावरण अधिकच चिघळत आहे असे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवावा, त्यासाठी जीआर घेऊन या मग उपोषण सोडतो, असे जालन्यात उपोषणाला बसलेले समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणत आहेत. सरकारी जीआर काढणे इतके सोपे नाही. पण ओशासनावर ओशासने दिल्यामुळे सरकारे बदलली आणि सर्वाचाच आरक्षणाला पाठिंबा आहे असे असतानाही हा प्रश्न एवढा का चिघळत आहे. सर्वोच्च न्यायालय ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायला तयार नाही. इतर कोणाचे आरक्षण काढता येत नाही. मोठमोठे वकील लावून सर्वच सरकारे थकून गेली आहेत. थोडक्यात आरक्षणाचा तिढा सोडवणे हे आता सर्वपक्षीय काम झालेले आहे. यामुळेच परस्परांना दूषणे देण्यापेक्षा आम्ही अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे बेरजेचे राजकारण करून हे आरक्षणाचे कारण निवारण झाले पाहिजे. बाकी दुसरा कोणताही मार्ग नाही हे सर्व संबंधितांनी ध्यानी घ्यावे.