देशात धर्म-जातीच्या नावावर जास्त दिवस राजकारण चालणार नाही; कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांची भाजपवर टीका

सध्या देशात महागाईमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या चटक्यामुळे घरात चांगले पौष्टिक अन्न शिजवणे गृहीणींसाठी कठीण झाले आहे. दुसरीकडे वाढलेल्या इंधनाचे दर आणि बेरोजगारी सारखे महत्त्वाचे मुद्दे असताना, भाजपकडून फक्त, धर्म, जाती आणि रंगांच्या नावावर राजकारण सुरु आहे. हे सामान्य नागरिकांना समजले आहे. त्यावरुन देशात धर्म आणि जातीच्या नावावर जास्तदिवस राजकारण चालणार नाही, जनताच यांना घरचा रस्ता दाखवेल अशी टीका कॉंग्रेस उत्तर प्रदेश विधिमंडळ नेत्या आराधना मिश्रा (Aradhana Mishra) यांनी केली. प्रजासत्ताक दिनी सुरू होत असलेल्या कॉंग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या, जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा ठेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. नेहरूंनी शिक्षण, आरोग्य, उद्योग व व्यवसायाची भरभराट केली. विकासाचे नवरत्न उभे केले. आज याच नवरत्नाला पंतप्रधान मोदी विकत आहेत. हरीत व धवल क्रांती कॉंग्रेसने आणली. आयआयटी, आयआयएम ही कॉंग्रेसची देण आहे. भाजप तर देशाच्या विकासाच्या पाया नेस्तनाबूत करीत असल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधीमंडळ कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *