राज्य उत्पादन शुल्क विभाग चालू आर्थिक वर्षात नागपूर (Nagpur) जिल्ह्यात धडक मोहीम राबवत असून 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 2 कोटी 42 लाख 85 हजार 604 रुपये किमतीचा मुद्देमाल (दारू, वाहने) जप्त केला आहे. शहरासह प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या विभागाच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे. 463 केसेसमध्ये जप्त केलेली 60 लाखांची दारू बेवारस होती, तर एप्रिल ते डिसेंबर या काळात 2134 आरोपींना अटक केली. मात्र तरीही शहरासह ग्रामीण भागांतही अनेक ‘खास’ ठिकाणी अवैध दारु विक्री जोरात असून काहींवर विभागाची विशेष कृपा असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
निवडणूक काळात सर्वाधिक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोव्हेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात 301 केसेस केल्या. त्यात 275 आरोपींना अटक आणि चार वाहने जप्त केली होती. या केसेसमध्ये 42 लाख 93 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र शहरात वर्षभर ‘ड्राय डे’ असूनही रात्री उशिरापर्यंत दारुविक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई टाळण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.