आघाडीच्या ऐक्याला तडा लावू नका! शिवसेना खासदर संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला

मुंबई प्रतिनिधी : भाजपच्या विरोधात मोट बांधण्यात शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. भाजपविरोधी भूमिका ही कुण्या एकट्याची मक्तेदारी नाही. भाजपच्या विरोधात आम्हाला आंबेडकर यांच्याप्रमाणेच मायावती, ममता बॅनर्जी यांची मदत हवी आहे. आमची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी ही गेल्या अडीच वर्षांपासून उभी आहे. त्यामुळे आंबेडकरांनी अनावश्यक वक्तव्ये करून या आघाडीच्या ऐक्याला तडा लावू नये, असा सल्ला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारीला एकत्र येऊन युतीची घोषणा केली. त्याचवेळी ठाकरे यांनी आंबेडकर हे महविकास आघाडीचा भाग होतील,असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, युतीची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचेच असल्याचे विधान करून खळबळ उडवून दिली होती. या विधानावर राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आंबेडकर यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यांच्या प्रमाणे आमच्यातही बाबासाहेब आंबेडकर भिनलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ऐक्याला तडे जातील असे विधान कुणी करू नये. आघाडी टिकावी म्हणून काळजीपूर्वक बोलले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

भूतकाळातील मतभेद दूर ठेवले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांना सांगितले आहे .प्रकाश आंबेडकर यांचा आरोप गंभीर आहे. पण आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही. आंबेडकर यांनी आता जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी. शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत, असे म्हणणे हा त्यांच्या कारकिर्दीवरील मोठा आरोप आहे. पवार भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपला दूर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊ दिले नसते, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. शरद पवार यांनी प्रत्येक वेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा चिंचवडसाठी आहे. मात्र, त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही आणि तो लवकरच जाईल, असेही राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *