मुंबई, दि.०७। प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरातच नाही तर कोणालाही पक्षात यायचे असेल तर भाजपचे दरवाजे उघडे आहेत. ते जर आले तर त्यांचा योग्य सन्मान राखू, काँग्रेसमध्ये त्यांच्या असलेल्या उंची पेक्षा मोठे स्थान त्यांना देऊ असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद आज पार पडली.
या परिषदेत त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्ष वाढीसाठी खूप काम केले आहे. ते विधकमंडळाचे ९ वेळा सदस्य राहिले आहेत. पक्षांच्या वागणुकीमुळे थोरांताना पदाचा राजीनामा द्यावा लागणे ही खूप गंभीर बाब आहे. माझ्यावर जर थोरातां ऐवढा मोठा नेता नाराज झाला असता तर विचार केला असता, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मदत केली, याचा अर्थ आम्ही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली असा होत नाही. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते भाजपमध्ये येऊ शकतील, आमची दारे त्यांच्यासाठी कायम उघडी आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.