राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ङ्कुले आदी महापुरुषांचा अवमान केल्यामुळे राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रात खदखद होती. राज्यातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते. ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती. विरोधकांनी तर महामोर्चा काढून राज्यपालांविरोधातील संतापाला वाट मोकळी करून दिली होती. त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावं लागलं आहे. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. याच वर्षी सुप्रीम कोर्टातून निवृत्त होणारे न्यायाधीश अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अब्दुल नझीर यांनी राम मंदिर, ट्रिपल तलाक यासारखे प्रकरणावर निर्णय दिलेला आहे. आज १३ राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी ९ राज्यात निवडणुका होणार आहेत. यंदा नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पूर्वोत्तरमधील चार राज्यांचा समावेश आहे.
त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम येथे निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. तर मध्य प्रदेश, राज्यस्थान आणि छत्तीसगड येथे पुढील काही दिवसांत निवडणुकांची घोषणा होणार आहे. तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि तेलंगाणामध्येही यंदा निवडणुका होणार आहे. केंद्रशासित प्रदेश झालेल्या लदाखमध्ये उपराज्यपालनियुक्त करण्यात आलेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. आमच्याकाळात नेहरु, गांधींजी आणि सुभाषचंद्र बोस चांगलेव वाटायचे. ते आमचे आवडते नेते होते. पण आज तुमचा हिरो कोण असं विचारलं तर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्याकाळातील आहेत. आधुनिक काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं होतं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला तर मुंबईचे काय होईल. मुंबईत पैसा शिल्लक राहील का? असा सवाल त्यांनी केला होता.