बेलखेड,दि.१३ (प्रतिनिधी)ः गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. काल्याच्या किर्तनानंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाला येथे सुरुवात झाली. या महोत्सवातील कीर्तनाचे पहिले पुष्प गुंफताना हभप गणेश महाराजांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी हभप योगेश महाराज खवले, ८ ला हभप संदीप महाराज घुगे, ९ ला कांचनताई शेळके, १० ला दत्ता महाराज पाकधने, ११ ला केशव महाराज मोरे यांचे कीर्तन पार पडले. १२ फेब्रुवारी रोजी श्रींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडली.
यानिमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने या मिरवणुकीत सहभाग घेतला. रात्री ११ वाजेपर्यंत महिला- पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी हभप कोंडीराम महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत जवळपास १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.गावातील, पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन, भागवताचार्य किशोरीताई सांगोले यांच्या अमृतवानीतील भागवत कथा, महाप्रसाद आणि सर्वच धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला. नियोजित मंगल कार्यालयासाठी अनिलभाऊ गावंडे यांच्याकडून ५१ हजारांची देणगी आजच्या प्रकटदिन सोहळ्याच्या समारोपाला लोकजगर मंचचे संस्थापक अनिलभाऊ गावंडे उपस्थित होते. मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विेशस्त समितीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मंदिर समितीच्या प्रस्तावित मंगल कार्यालयासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. अकोली रुपराव येथील माजी पोलीस पाटील जयंतराव वाकोडे यांनीही ११ हजाराची देणगी यावेळी जाहीर केली. सर्व दानदात्यांचे विेशस्त समितीच्यावतीने सुधाकर खुमकर यांनी आभार मानले.