अकोला,दि.१३ (प्रतिनिधी)ः अकोली जहागीर येथील संत गजानन महाराज यांनी सजल केलेल्या विहिरीवर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या शिस्तीत भाविकांनी दर्शन व महाप्रसाद घेऊन भक्ती भावपूर्ण वातावरणात प्रगटदिन साजरा केला.श्रींचा १४५ वा प्रकट दिन महोत्सवा निमित्य गत सात दिवसांपासून भाविकांनी कृष्णा महाराज वानखेडे वाकोद जि.जळगाव खांदेश यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा लाभ घेतला. तसेच सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले .
प्रकट दिनाच्या पूर्व संध्येला श्रीतीर्थ पुष्करणी पासून आकोली जहागीर गावातून श्रींच्या पालखीची परिक्रमा करण्यात आली.या परिक्रमेत श्री संस्थेच्या दिंडी सोबतच संत वासुदेव महाराज अकोट , वडगाव मेंढे,पुंडा,दिवठाणा इत्यादी गाववरून या उत्सवाकरीता आलेल्या दिंड्या व हजारो गजानन भक्त सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाचे गजराने आकोली जहागीर नगरी दुमदुमून गेली होती. श्री गजानन महाराज व भास्कर महाराज या गुरू -शिष्यांचे मंदिराजवळून पालखी मार्गस्थ झाली. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी श्रींच्या पालखीचे पूजन व स्वागत केले. श्रींच्या विहिरीवर मिरवणूकीचा समारोप आरतीने झाला. श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत विलास बुवा वाघमारे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता फुले, गुलाब पुष्पांची उधळण व श्रींच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा उपस्थित सर्व भाविकांनी शिस्तीत लाभ घेतला.श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव च्या सेवाधारी मंडळींनी भाविकांच्या दर्शन व महाप्रसादाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली होती .प्रकट दिनाला हजारो भाविकांनी गजानन महाराज व भास्कर महाराज या गुरू शिष्यांच्या मंदिरात दर्शनाचा व श्रींनी सजल केलेल्या विहिरीच्या श्री तीर्थाचा लाभ घेतला .