वर्धा, दि.१३ प्रतिनिधी. धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत विहिरींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. योजनेंतर्गत जिल्ह्याला मंजुर सर्व विहिरींची कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजे तीन महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी बैठकीत दिले. बैठकीला जिल्हाधिकार्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सहअध्यक्ष रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, रोहयो उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, लघु पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अजय लाडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.विद्या मानकर, जि.प.बांधकामचे कार्यकारी अभियंता पेंढे, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.वहीरी मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात यावे. लाभार्थ्यांच्या सतत संपर्कात राहून उपविभागीय जलसंधारण अधिकारी व गटविकास अधिकार्यांशी समन्वय ठेऊन विहीरींचे कामे केली जावी, अशा सुचना बैठकीत करण्यात आल्या. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लाडसे यांनी जिल्ह्याची विहीरींच्या बांधकामाची सद्यस्थिती बैठकीत सादर केली.