धम्माचे आचरण केल्याने जीवनात सुख, समाधान आणि शांती मिळते

उमरखेड दि. १३ महासागर ता.प्र. मनुष्याच्या जीवनाला सुख समाधान शांती लाभण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कष्ट करावे लागत नाही. त्यासाठी फक्त धम्माचे आचरण करावे लागेल. त्यानेच मनुष्याच्या जीवनाला सुख, समाधान आणि शांती मिळते, असे प्रतिपादन अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी केले. मुळावा येथे आयोजित १८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या समारोप सत्रात धम्मदेसना देताना ते बोलत होते. अठराव्या धम्मपरिषदेच्या समारोप सत्रात, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. भदन्त खेमधम्मो महाथेरो, भदन्त दयानंद महाथेरो, भदंत इंदवश महाथेरो, भदंत करूणानंद, भदंत ज्ञानरक्षित, डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भदन्त धम्मानंद, भदन्त धम्मज्योती यासह देश विदेशातील भिक्षू, भिक्षूणी, श्रामणेर, श्रामणेरी यांची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये बौद्ध सिद्धांतावरील अनेक विचारावर सखोल अशी भंतेजीची धम्मदेसना झाली. समारोह सत्राच्या अध्यक्षस्थानी बोलताना भदंत धम्मसेवक पुढे म्हणाले की मनुष्याला सुख मिळण्यासाठी कमिशनर जिल्हाधिकारी किंवा अधिकारी यांच्यासारखी ड्युटी करावी लागणार नाही, शेतामध्ये शेतकऱ्यांसारखे राबावे लागणार नाही, व्यापार करावा लागणार नाही, हे सगळे कामे करण्यासाठी मनुष्याला कष्ट करावे लागते त्याचा उद्देश असतो की मला धन प्राप्ती व्हावी सुख प्राप्ती व्हावी पण या कुठल्याही कार्यातून मनुष्याला सुख प्राप्ती होत नाही. त्यासाठी धम्माचेच आचरण करावे लागेल त्या शिवाय सुखप्राप्ती होणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी बुद्ध संदेश मासिकाचे मान्यवर भिक्षूंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

समारोपात ११ ठरावाचे वाचन डॉ. सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते करण्यात येऊन, पाली विद्यापीठ स्थापन व्हावे, पाली भाषा ही सर्वत्र शाळेमधून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधून शिकवण्यात यावी यासह विविध ठराव वाचण्यात आले. दि. ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी आयोजित आठव्या धम्म परिषदेमध्ये केवळ भिक्षुद्वारे धम्मदेसना देण्यात आली. भगवान बुद्धाने जगाच्या उद्धारासाठी जो सुख समाधान शांतीसाठी जो धम्म दिला त्या धम्माचे सर्व बांधवांना ज्ञान व्हावे त्यांचा जीवनमार्ग सुखी व्हावे या उदात्त हेतूने गेल्या १७ वर्षांपासून भारतीय बौद्धज्ञालंकार शिक्षण संस्थेच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात येते. शिस्तबद्धरित्या आयोजित या धम्म परिषदेसाठी सदधम्म प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा सम्यक दृष्टी माध्यमिक, विज्ञान उच्च माध्यमिक त्याचबरोबर मिलिंद महाविद्यालय मुळावा चे सर्व संस्थेचे कर्मचारी शिक्षक वृंद तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *