आज वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष चपळगावकर यांनी अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. मराठी भाषेचे महत्त्व, मराठी साहित्याची होत असलेली दुरावस्था, मराठी शाळांची अधोगती आणि मराठीतील इतर अनेक बाबींचा उल्लेख आपल्या भाषणात केला. आम्ही सुरुवातीलाच त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला त्यावर जाऊ इच्छितो. वर्धा परिसरातील पवनार येथे ज्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले ते विनोबा भावे थोर मराठी साहित्यिक होते. त्यांनी साहित्य आणि भाषा यांचा मूलभूत विचार केला होता. विनोबा म्हणतात, समुद्र पहा पण त्यात गटांगळ्या खाऊ नका. तसेच साहित्यिकाने अमुक लिहावे, तमुक लिहू नये हे कोणी सांगू नये. तसे करणे म्हणजे साहित्यिकांचा अवमान आहे असे चपळगावकर नमूद करतात. आत्मज्ञानी पुरुषाप्रमाणे प्रामाणिक, वैज्ञानिक आणि स्वतंत्र साहित्यिक हा स्वाधीन असतो, असे सांगून चपळगावकारांनी साहित्यिकांनी स्वाधीन व्हावे, असा सल्ला दिला आहे. सरकारने नुकतेच जे साहित्य संमेलन भरविले त्यावर चपळगावकर म्हणतात, सरकारचे हे काम नाही साहित्य संस्थांनी अशी संमेलने भरविली पाहिजेत. पूर्वी हे काम सरकारी मदतीशिवाय संस्था करीत असत. पण आता आपले साहित्य संमेलन सरकार मदतीशिवाय होऊच शकत नाही, अशी स्थिती आहे. साहित्य आणि संस्कृतीचा व्यवहार स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हाच आपले साहित्य समृद्ध होईल, असे अध्यक्ष म्हणतात. पण आज काय अवस्था आहे? शासनाचे अनुदान घेऊन आपली स्वायत्तता कशी कायम राहील? आज वाचकांची आवडही मुद्रित साहित्याकडून इतरत्र वळली आहे.
पुस्तकांचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. आता वृत्तपत्रातही रविवारच्या पुरवण्यांमध्ये लघुकथा वगैरे छापणे जवळजवळ बंद झाले आहे. गावोगावात ग्रंथालये उभारली गेली पाहिजेत असे आपण म्हणतो. पण आज जी ग्रंथालये आहेत त्याचाही उपयोग होत नाही. आपल्या मराठी कुटुंबातील मुले मराठी वाचत नाहीत. ललित पुस्तकांची दुकाने कमी होत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून आपली मुले मराठीपेक्षा इंग्रजीच्या जवळ जात आहेत. मोठमोठ्या घरात शंभर पुस्तकेही दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आपली मराठी भाषा कशी जिवंत राहील याची qचता मराठीच्या सेवकांना वाटत असेल तर त्यात नवल ते काय? वैचारिक वाङ्मयाचा विचार केला तर नवीन सत्य सांगणेही अवघड झालेले आहे.
महाराष्ट्राला विचारवंतांची मोठी परंपरा आहे. समाजहिताचा विचार करणारे व निर्भयपणे आपले विचार मांडणारे विचारवंत हा आपला अभिमानस्पद वारसा आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी दूर करणारे विचारवंत आता कमी कमी का होत आहेत? लेखकांच्या स्वातंत्र्याबद्दल देशभर चर्चा चालू असते. स्वतंत्र वृत्तीच्या पत्रकारांवरही आजचा दिवस जगणे कठीण होण्याचे दिवस आले आहेत, असे चपळगावकर म्हणतात. पण अशा परिस्थितीतही मराठी साहित्याचा हा दिवा तेवत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आणि तेच देशहिताचे आहे, असे चपळगावकर म्हणतात. शेवटी साहित्याकडून समाज सुधारणेचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि समतेच्या मूलभूत हक्काचा आधार हेच साहित्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. न्यायमूर्ती चपळगावकरांनी आपल्या भाषणातून विविध लेखकांचा उल्लेख करून त्यांच्या महत्वाची जाणीव करून दिली आणि मराठी साहित्याला उर्जितावस्था आणण्यासाठी साहित्यिकांनी झटले पाहिजे असा संदेश दिला, हे त्यांच्या न्यायमूर्तीत्वाचा सार आहे, असे आपण समजले पाहिजे.