टॉप स्टोरी महाराष्ट्र

उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तीच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल – छगन भुजबळ

मुंबई दि. २८ जानेवारी- अत्यंत धक्कादायक… विश्वास बसत नाही! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तीच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल. परंतु दुर्दैवाने हे वास्तव स्वीकारण्याची कठीण वेळ आज आपल्यावर आली आहे. व्यक्तिगत मला स्वतःलाही यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे असेही छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल ११ वेळा मांडला असून ते महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. त्यांच्या कामाचा मुख्य भर हा प्रशासकीय शिस्त, पायाभूत सुविधा आणि आर्थिक नियोजन यांवर राहिला. पिंपरी-चिंचवड शहराला ‘सर्वात वेगाने विकसित होणारे शहर’ बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बारामती, पुणे, पिंपरी – चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाडीच्या कामातून त्यांनी एक वेगळा ठसा निर्माण केला. तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा हा लोकनेता होता. पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागणारा हा झंझावात महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र धावत होता असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अजितदादांशी ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीपासून आहेत. करारी, रोखठोक स्वभाव असलेल्याअजितदादांनी विचारांशी कदापि तडजोड केली नाही. मला वाटतं हेच त्यांच्या आणि माझ्या स्वभावातील साम्य होतं. त्यांनी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वात बारामतीच्या स्थानिक राजकारणापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पवारसाहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची नस ओळखणारा आणि सर्वसामान्यांशी जोडला गेलेला जमिनीवरील नेता अशी त्यांची ओळख होती. याच जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट ठसा उमटविला असेही छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

स्वभावाने रोखठोक, प्रशासनावर घट्ट पकड आणि व्यक्तिमत्वात एक दरारा असलेला राजकारणी अशी प्रतिमा असूनही मनाने अतिशय स्वच्छ आणि जिंदादिल असलेल्या अजितदादांचा वावर चैतन्य निर्माण करणारा असायचा. पत्रकारांशी बोलताना प्रतिकूल असलेल्या प्रश्नांवरही मिश्किल चिमटे काढणारे दादा, अनावधानाने काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करणारे दादा देखील या महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांनी माझ्या ज्येष्ठत्वाचा कायम सन्मान केला. दादांनी मला आणि आमच्या भुजबळ कुटुंबाला दिलेलं प्रेम कायम स्मरणात राहील. पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत असल्याचे सांगतानाच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करत दादा,हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही अशा भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *