महाराष्ट्र

जिजाऊ जन्मोत्सव चार दिवसांवर, तरीही प्रशासन ढिम्म पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षावर मराठा क्रांती मोर्चा संतप्त; आंदोलनाचा इशारा

विशेष प्रतिनिधी :राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भाविकांना साद घालणारा जिजाऊ जन्मोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असतानाही प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाकडून दिसणारी उदासीनता आता उघडपणे समोर आली आहे. बुलढाणा सिंदखेड येथे १२ जानेवारीला साजरा होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनाकडे दोन्ही पालकमंत्र्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी अद्यापपर्यंत जिजाऊ जन्मोत्सवाच्या संदर्भात एकही आढावा बैठक घेतलेली नाही, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. जन्मोत्सवासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो जिजाऊ भक्तांसाठी वाहतूक, पाणी, स्वच्छता, निवास, आरोग्य व सुरक्षेच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्याच नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक यांनी थेट सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल करत सांगितले की, “राजमाता जिजाऊ या केवळ एका समाजाच्या नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेरणास्थान आहेत. मात्र त्यांच्या जन्मोत्सवाच्या नियोजनाबाबत प्रशासनाची बेफिकिरी अत्यंत लज्जास्पद आहे.”

विशेष म्हणजे, जिल्ह्याला दोन पालकमंत्री देण्यात आले असताना—दुसरे सहपालकमंत्री संजय सावकारे असताना—इतक्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरील सोहळ्याची कोणतीही ठोस तयारी नसणे, हा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा स्पष्ट पुरावा असल्याचा संतप्त आरोप होत आहे.

दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल होतात. मात्र यंदा जन्मोत्सव तोंडावर आला असताना देखील भाविकांसाठी एकही ठोस सुविधा प्रत्यक्षात दिसत नसल्याने नाराजीचा सूर वाढला आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची दाट शक्यता असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

यावर समृद्धी महामार्गालगत राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने जाहीर करूनही अद्याप प्रत्यक्षात तो पुतळा उभा राहिलेला नाही. या आश्वासनपूर्तीतील दिरंगाईवरून मराठा क्रांती मोर्चाने सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “घोषणा करण्यात पटाईत असलेले सरकार प्रत्यक्ष कामात मात्र अपयशी ठरत आहे,” असा टोला आंदोलनकर्त्यांनी लगावला.

जिजाऊंच्या विचारांचे स्मरण करण्याच्या ऐतिहासिक क्षणीही जर शासन आणि राजकीय नेतृत्व उदासीन राहत असेल, तर ते जिजाऊंच्या स्मृतींचा अपमान असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने येत्या काही दिवसांत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला असून, वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केला आहे.

अवघ्या चार दिवसांवर आलेल्या जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकार जागे होणार का, की हा पवित्र सोहळा पुन्हा एकदा प्रशासनिक निष्क्रियतेचा बळी ठरणार—याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *