हिंदी विद्यापीठात चित्रकला स्पर्धेचे आयोजन:विद्यार्थ्यांनी दगडांवर रंगांतून साकारली अद्भुत चित्रकला
वर्धा, २५ जानेवारी २०२६ : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रविवार, २५ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वार परिसरात पडलेले दगड एकत्र करून त्यांचे पाच मोठे ढिगारे तयार करण्यात आले होते. या दगडांवर विद्यार्थ्यांनी रंग भरून अप्रतिम चित्रकला साकारली.
काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध वारली कला रेखाटली, तर काहींनी मधुबनी कलेचे सादरीकरण केले. या स्पर्धेत गांधीजींचा चरखा, विद्यापीठाचे प्रतीकचिन्ह, एनसीसीचा लोगो, स्वच्छतेचा संदेश, शिक्षण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पर्यावरण, वन्यजीव आदी विषय केंद्रस्थानी होते.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली सर्जनशीलता दगडांवर रेखाटलेल्या कलेतून व्यक्त केली. अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी बैठकीत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्याचे निर्देश दिले होते. या उपक्रमासाठी प्रदर्शनकारी कला विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश पावडे यांची संयोजक म्हणून, तर शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राम अवध यांची सह-संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. रंगांच्या माध्यमातून त्यांनी जणू निर्जीव दगडांमध्ये प्राण फुंकले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात आयोजन समितीचे डॉ. विधु खरे दास, डॉ. वीरेंद्र प्रताप यादव, डॉ. संदीप सपकाले, डॉ. चंद्रशेखर पांडेय, बी. एस. मिरगे तसेच संगीता मालवीय आदींनी सहकार्य केले.
स्पर्धेच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रकार आशीष पोहाने, संजय तिरले व आशीष उजवने यांचा समावेश होता. रंगीबेरंगी रंगांतून साकारलेल्या या सुंदर चित्रांमुळे विद्यापीठ परिसर अधिक आकर्षक झाला असून, त्यातून कला व संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडत आहे.




