गढचिरोली

जंगलातून ‘लाल’ सावट कायमचे संपले; गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांनी ठोकला नक्षलवादाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:गडचिरोलीच्या दुर्गम डोंगरदऱ्यांत अनेक दशकांपासून दहशतीचा थरार निर्माण करणाऱ्या माओवादी विचारधारेचा शेवटचा अवशेषही आता जमीनदोस्त झाला आहे. जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांच्या वर्चस्वाचे प्रतीक म्हणून उभी असलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी एका धडाकेबाज मोहिमेत उद्ध्वस्त केली आहेत. या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोर उमटवली असून, “हा केवळ दगड-विटांच्या स्मारकांचा अंत नाही, तर लोकांच्या मनातील भीतीचा कायमचा अंत आहे,” अशा शब्दांत त्यांनी लोकशाहीच्या विजयाचा एल्गार पुकारला आहे.
माओवाद्यांनी स्थानिक जनतेवर वचक बसवण्यासाठी एटापल्ली, भामरागड, धानोरा आणि जिमलगट्टा यांसारख्या दुर्गम उपविभागांत ही स्मारके उभारली होती. मात्र, राज्याच्या ठाम माओवादविरोधी धोरणामुळे आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे या दहशतीचे बालेकिल्ले आता कोसळले आहेत. गडचिरोली पोलीस, सी-६० कमांडो आणि सीआरपीएफच्या तब्बल ८०० जवानांनी जीवाची बाजी लावून ही संयुक्त मोहीम फत्ते केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) परिसराची खातरजमा केल्यानंतर ही सर्व ४४ स्मारके नेस्तनाबूत करण्यात आली. ही कारवाई म्हणजे गडचिरोलीतील रक्ताळलेल्या इतिहासाचे पान कायमचे मिटवून विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे जिवंत उदाहरण आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मते, गडचिरोली आता हिंसेकडून विश्वासाकडे आणि रक्तापाताकडून समृद्धीकडे वेगाने वाटचाल करत आहे. सरकारच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आणि सातत्याने राबवलेल्या विकास प्रकल्पांमुळे नक्षलवादाला मिळणारा आधार पूर्णपणे तुटला आहे. एकेकाळी जिथे नक्षली स्मारके उभी होती, तिथे आता प्रशासनावरील विश्वासाचा पाया घट्ट झाला आहे. ही कारवाई म्हणजे नक्षलवादी चळवळीला बसलेला सर्वात मोठा मानसिक धक्का असून, गडचिरोली आता दहशतीच्या शेवटच्या चिन्हापासून मुक्त झाली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *