चंद्रपूर जिल्हा

सीटीपीएस ॲश डंपिंगवरून दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष; चाकू-कुर्हाडीने हल्ला, एक मजूर जखमी

दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी; सहा आरोपींवर गुन्हे, एकास अटक, ११ अनोळखींचा शोध

भद्रावती :तालुक्यातील सायवन परिसरात सीटीपीएस येथून निघणाऱ्या ॲश (राख) डंपिंगच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चाकू व कुर्हाडीने हल्ला करण्यात आल्याने एक मजूर जखमी झाला असून, दोन्ही गटांनी परस्परांविरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे नोंदवून एकास अटक केली असून, ११ अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे.

पहिली घटना : सायवन परिसरात चाकूचा प्रयत्न

दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास जुन्या सायवन परिसरातील ॲश डंपिंग ठिकाणी ही घटना घडली. फिर्यादी शाकीब शकील काजी (वय २३, रा. घुटकाला वॉर्ड, चंद्रपूर) हा हासीम खान यांच्या नावावरील ॲश लोडिंग कामावर गाड्यांचे नंबर नोंदविण्याचे काम करीत होता.

यावेळी कारमधून आलेल्या संगम सागोरे (रा. मित्रनगर, रामनगर, चंद्रपूर), अर्जुन मुंडे, अशोक मुंडे व संतोष जुनघरे (रा. सीटीपीएस, चंद्रपूर) यांच्यासह इतर अनोळखी इसमांनी काम थांबविण्यास सांगून वाद घातल्याचा आरोप आहे. संगम सागोरे याने चाकूने पोटावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा, तर इतरांनी लोखंडी रॉडने मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. या हल्ल्यात सुफीयान शकील शेख यालाही मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भादंवि (बीएनएस) कलम १०९(१), १२६(२), २९६, १८९(१)(२)(४), १९०, १९१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरी घटना : घोडपेठ शेतशिवारात ट्रकची काच फोडली

याच दिवशी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान घोडपेठ शेतशिवारात दुसरी घटना घडली. फिर्यादी रवी बलय्या अटकूरवार (वय ३८, रा. नेताजी नगर, विजासन, भद्रावती) हे सौ. बबली संतोष जुनघरे यांच्या ट्रकवर चालक म्हणून कार्यरत आहेत.

आवंडा येथील ॲश डंपिंगवरून राख भरून शेतात आणल्यानंतर ६ ते ७ जण मोटारसायकलीवर येऊन ट्रक अडविल्याचा आरोप आहे. एका इसमाने कुर्हाडीने ट्रकची काच फोडली तसेच मालक संतोष जुनघरे यांना धंदा बंद करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने चालक शेतशिवारातून पळून गेल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी आसीम खान ताडाली व श्रीकांत काळे याचे सह अनोळखी ७ जनांनवर बीएनएस कलम ३२९(३), १८९(२)(४), १९१(३), २९६, ३५१(३), ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन गटांमध्ये कंत्राटावरून वाद

सीटीपीएस येथील ॲश डंपिंगवरून राख उचलण्याच्या कंत्राटावरून दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, चाकू व कुर्हाडीचा वापर झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भद्रावती पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहा नामनिर्देशित आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले असून, एकास अटक केली आहे. उर्वरित आरोपी व ११ अनोळखी इसमांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *