अखेर नियतीचा ‘टोकदार’ न्याय! भोंदूबाबाच्या वलयाने घेतला बळी; मुख्यमंत्र्यांचा तो एक फोन आणि चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीला ‘फुलस्टॉप’?
विशेष प्रतिनिधी:मुंबई/नाशिक: “महिलांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या हातांनी एका भोंदूबाबाची पाद्यपूजा का केली?” या प्रश्नाचे उत्तर अखेर रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाच्या राजीनाम्याने द्यावे लागणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या कृत्यांचे ओझे आता राज्य महिला आयोगाच्या दालनापर्यंत पोहोचले असून, सूत्रांच्या माहितीनुसार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चाकणकर यांना पद सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या भोंदूबाबावर एका महिलेच्या लैंगिक शोषणासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला, त्याच्याशी असलेली जवळीक चाकणकर यांच्या अंगाशी आली आहे. खरातची पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ आणि औक्षणाचे फोटो समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला होता. ‘शिवसेना’ (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर चाकणकरांवर अघोरी तंत्र-मंत्राचे आणि बोट कापून पूजा केल्याचे धक्कादायक आरोप करून सरकारची कोंडी केली होती.
सुरुवातीला या प्रकरणात गप्प बसलेल्या सत्ताधारी वर्तुळात आता मोठी हालचाल सुरू झाली आहे. एसआयटी (SIT) तपासात खरातच्या २०० कोटींच्या अफाट मालमत्तेचे आणि राजकीय कनेक्शन्सचे धागेदोरे मिळाल्यानंतर, सरकार आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही ‘कडक कारवाई’चे संकेत दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांच्या ‘गच्छंती’वर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.
महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असताना एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला समर्थन देणे, ही बाब सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. आता या ‘राजीनामा सत्रा’नंतर चाकणकर कोणती भूमिका मांडतात आणि महिला आयोगाची सूत्रे कोणाकडे सोपवली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका भोंदूबाबाच्या ‘विळख्या’ने राज्याच्या राजकारणातील एका प्रभावी महिला नेतृत्वाचा ‘खेळ’ संपवला आहे, अशी चर्चा सध्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये रंगली आहे.




