नवी मुंबई

बस अभावी एन.एम.एम.टी.ची सेवा कोलमडली; प्रवासी त्रस्त

नवी मुंबई :पुरेशा बस अभावी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एन एम एम टी) सेवेची वाताहत झाली आहे. प्रशासनाच्या अयोग्य नियोजन आणि अकार्यक्षमता यांमुळे २१ व्या शतकातील आधुनिक शहरात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास बसची वाट पहावी लागत असल्याचे नामुष्की ओढवली आहे.

१५ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहराला पुरेशा प्रमाणात बस सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सुमारे ६०० ते ७०० बसेसची आवश्यकता आहे. मागील वर्षी सुमारे ४०० ते ४५० बस प्रवाशांच्या सेवेत असल्याने सुमारे ३८ ते ४० लाखापर्यंत दररोजचे उत्पन्न प्राप्त होत होते. एक वर्षापासून केवळ ३०० ते ३२५ बस प्रवाशांच्या सेवेत असल्याने उपक्रमाला केवळ २६ ते २८ लाख रुपये प्रति दिन उत्पन्न येत आहे. तांत्रिक कारणामुळे महालक्ष्मी एजन्सीच्या ११४ बसचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे घणसोली बस आगारामध्ये या बस पडून आहेत. कंत्राटदार आर्बीट्रेशन (न्यायालय) मध्ये गेला आहे.

दरम्यान अपुऱ्या बस अभावी प्रवाशांना बस स्टॉपवर तासन् तास ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात आहे. यामुळे प्रवाशांचा संतापाचा उद्रेक होऊन बस चालकांशी वादविवाद होऊन प्रसंगी हाणामारीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत; मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटना यांना याचे काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
जेव्हापासून उपक्रमामध्ये इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये विविध कंपन्यांनी उपक्रमाला बस पुरवठा केला आहे. या बस रस्त्यावर चालून काही महिने होत नाही तोच यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या होत्या. योग्य प्रकारे बॅटरी चार्जिंग होत नसल्याने दररोज अनेक बसच्या फेऱ्या रद्द होत आहेत. प्रवाशांना कुठेही रस्त्यामध्ये थांबवले जाऊन अन्य बसची वाट पाहत अनेक वेळ उभे केले जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून चालू असल्याने आता प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला आहे. परिणामी मुंबईमध्ये अशाच एका प्रकरणामध्ये प्रवाशांनी थेट वाहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या सर्वाला प्रशासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. बस फेऱ्या रद्द झाल्याने कायम कर्मचाऱ्यांना बसून ठेवून रोजंदारी किंवा ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना काम दिले जाते. परिणामी एन एम एम टी चे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान गेल्या वर्षभरापासून एन एम एम टी प्रशासनाकडून बस खरेदी करण्यात येणार असल्याचे वारंवार सांगितले जात होते; मात्र अद्याप प्रत्यक्षात एकही बस खरेदी करण्यात आली नव्हती. मात्र मागील महिन्यात बस खरेदीचे कंत्राट देण्यात आले असून मार्च अखेर दीडशे बस दोन टप्प्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *