ढाका, दि. ४ वृत्तसंस्था:भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, याचे रूपांतर आता कूटनैतिक संघर्षात झाले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अधिकृतपणे मागणी केली आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व साखळी सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करावेत. बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्याने बांगलादेशने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
बांगलादेश सरकारचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांनी या मुद्द्यावर अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. रविवारी ‘बीएसएस’ वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी क्रिकेट, आमचे खेळाडू आणि देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत.” नजरूल यांनी पुढे जोर देऊन सांगितले की, बांगलादेश आता स्वतःच्या अटींवर पुढे जाईल आणि कोणताही बाह्य दबाव किंवा अपमानास्पद वागणूक स्वीकारली जाणार नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील पावले उचलण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली. बैठकीनंतर, नझरुलने फेसबुक पोस्टमध्ये घोषणा केली की बीसीबीने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. नझरुल यांनी लिहिले की, “बांगलादेश विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात येणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज हा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आक्रमक जातीय धोरणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.”




