गोंदिया

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

महासागर प्रतिनिधी, गोंदिया, दि. ४ : गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे गावातून शेताकडे जात असताना जंगलातून आलेल्या रानगव्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे रविवार ४ जानेवारी सकाळी ९:४५ वाजता दरम्यान घडली.

मृतक शेतकऱ्याचे नाव नीलकंठ नंदलाल तुरकर (५७) रा. सोनेगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया असे आहे. नीलकंठ हा नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शेताकडे जाण्यासाठी निघाला. गावातील चौकात मित्रमंडळी सोबत थोड्यावेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर सोनेगाव ते शहरवाणी रस्त्यावर असलेल्या शेताकडे जाण्यासाठी निघाले. अचानक जंगलातून आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर हल्ला चढवून पोटात शिंगे खुपसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेत रानगव्याला पिटाळून लावले. मात्र त्यानंतर सदर रानगवा कवलेवाडा, चिचगावटोला परिसरात आल्याने या भागातील लोकांनी ही त्याला पिटाळून लावले.

तिरोडा तालुक्यातील सुकडी/डाकराम, पिंडकेपार, खडकी, डोंगरगाव, खमारी, बालापूर, आलेझरी, बेरडीपार, खुशीपार या गावांच्या परिसरात बिबट्या आणि अस्वलाचा वावर आहे. पिंडकेपार गावात प्रवेश करून बिबट्याने राजू शेंडे यांच्या गायीची शिकार केली तर वासराला जखमी केले. राजू शेंडे हे गोठ्यात म्हशीला सोडण्यासाठी गेले असता उघडकीस आली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी याची माहिती पिंडकेपार, बोदालकसा बिटचे वनरक्षक पटले यांना दिली. मागील तीन ते चार दिवसांपासून पिंडकेपार येथे बिबट्या फिरतोय. याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *