बुलढाणा

ज्ञानगंगामध्ये वाघाची रुबाबदार एन्ट्री

महासागर प्रतिनिधी बुलढाणा, दि. ४ : नवीन वर्षातील ही सर्वात मोठी ब्रेकिंग, सुखद वार्ता, गुड न्यूज म्हणजे बुलढाणा ते खामगाव राज्य महामार्गाच्या ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची शानदार अन यशस्वी एंट्री झाली आहे. अभयारण्यात दाखल होताच तीन तासातच त्याने शिकार करत स्वतःचे सामर्थ्य आणि साम्राज्याच्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून दिली.

वाघाच्या आगमनामुळे जिल्ह्यातीलच नव्हे विदर्भातील वन अधिकारी, कर्मचारी, वन्यजीव प्रेमी आणि ३० लाख बुलढाणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील शेकडोच्या संख्येतील बिबट, अस्वल, तडस अशा हिंस्त्र पशुंच्या सोबतीला आता वाघ आला आहे.

रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नर जातीचा पीकेसीटी-१ नावाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात देव्हारी आणि बोरखेड-तारापूर जंगलाच्या बाजूने सोडण्यात आला आहे. याठिकाणी बंदीस्त जाळी आहे. विशेष म्हणजे या वाघाने आज सकाळी एक शिकारही केली आहे. त्यामुळे हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात रुळणार, यात शंका नाही.

मिळलेल्या माहितीनुसार रात्री २ वाजेपासून पीकेसीटी वन या वाघाला बंदीस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. पेंच अभयारण्यातून या वाघाला आणले गेले आहे. याचे वय ३५ महिने असून तो अजून किशोरवस्थेत आहे. अर्थात याचे मूळ पांढरकवडा व्याघ्र प्रकल्प आहे. फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये त्याची आई मरण पावली होती. चार ते पाच महिन्याचे छावे (पिल्ल) त्यावेळी मिळाले होते. त्यात एक नर आणि मादी जातीचे बछडे होते. नंतर त्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात ठेवले होते. तिकडे दोघेही वाढले. आता ३ वर्षाचे झाल्यानंतर यातील वाघाला ज्ञानगंगांमध्ये आणले गेले. वाघीण अजूनही पेंचमध्येच आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात नर वाघ पीकेसीटी-१ याची यशस्वी एंट्री झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये पांढरकवडा व्याघ्र प्रकल्पात आई गमावलेल्या या वाघाचा वय ३५ महिने असून तो किशोरवयीन आहे. अभयारण्यात दाखल होताच तीन तासांतच वाघाने शिकार करून आपले सामर्थ्य दाखवले.

जवळपास १५ ते १६ तासांचा प्रवास करून वाघ मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाला. त्याला बेशुद्ध करण्यात आले होते. तीन ते चार तासानंतर तो शुद्धीत आला. नंतर त्याला अभयारण्यातील बंदीस्त क्षेत्रात सोडण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *