बुलढाणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने प्रशासनाची तयारी; विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी केली पाहणी

बुलढाणा, (जिमाका)दि. १७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, सुरक्षा आणि नियोजनाच्या दृष्टीने व्यापक तयारी सुरू आहे. या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज दौऱ्याशी संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेची बहुस्तरीय तपासणी करण्यात येत आहे. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्यात आला. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी पोलीस अधीक्षक सुधीर तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकारी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व प्रोटोकॉल पालन याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या.

पोलीस महानिरीक्षक यांनी सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देत, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपतींचा दौरा सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *